]Pune District Information in Marathi : तसेच पुणे जिल्हा भारतीसाठी विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्नोत्तरे
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व सरळसेवा असो वा गट ब, गट क अशी कोणतीही भरती असो, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो, म्हणजे जिल्हा व त्या जिल्ह्यावर आधारित प्रश्नोत्तरे. त्याच अनुसंघाने आजपासून आपण 36 जिल्हे आणि त्यांच्या विषयी माहिती पाहणार आहोत त्यापैकी आज आपण पुणे जिल्हा संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यापैकी आज आपण पुणे जिल्हया संपूर्ण माहीती आधारावर महत्त्वाच्या नोट्स घेणार आहोत. कारण पुणे हा जिल्हा सर्वात महत्त्वाचा जिल्हा आहे. सोबतच आतापर्यंत पुणे जिल्ह्यावर आधारित विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्नोत्तरे देखील घेणार आहोत.
Pune District Information in Marathi: महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पुणे इतके महत्त्व क्वचितच दुसऱ्या एखाद्या जिल्ह्यास मिळाले असेल. येथील इतिहास जितका समृद्ध तेवढेच येथील नैसर्गिक सुंदरता देखील . मराठीशाही पेशवाई यांचा चढउतार पुण्याने अनुभवला आहे. पुणे जिल्ह्याला धार्मिक, शैक्षणिक व सांस्कृतिक वारसा फार मोठा लाभलेला आहे. पुण्याला शिक्षणाचे माहेरघर सांस्कृतिक राजधानी अशी बिरुदे प्राप्त झाली आहेत.
या पुण्यात छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, आगरकर, वि. दा. सावरकर ,वासुदेव बळवंत फडके, धोंडो केशव कर्वे, उमाजी नाईक, लोकहितवादी, पु.ल. देशपांडे, नरेंद्र दाभोळकर अशा अनेक थोरांनी वास्तव्य व कार्य केलेले आहे. म्हणून महाराष्ट्राच्या अभ्यासामध्ये पुण्याचा अभ्यास हा विशेष ठरतो. ऐतिहासिक, सांस्कृतिक याबरोबरच सध्या औद्योगिक व विकासात्मक दृष्ट्या देखील पुणे प्रगतीपथावर आहे. पुणे परिसरामध्ये संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज यांच्या वास्तव्याच्या पुण्य खुणा विखुरलेल्या आहेत.
पुणे जिल्हा ऐतिहासिक :-
पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानली जाते. या सांस्कृतिक विकासाच्या खुणा इ.स. दुसऱ्या शतकापर्यंत सापडतात. राष्ट्रकूट राजवटीच्या काळात यास पुनवडी या नावाने ओळखले जात असे. मुळा -मुठा नदी संगमावर वसलेले पुण्यशहर म्हणून यास पुणे हे नाव पडले असावे असे म्हणतात. मोगल काळात पुण्याचा उल्लेख ‘कसबे पुणे’ असा केला जात असे. पुण्याजवळील जुन्नर हे दख्खनच्या हिंदू राजाच्या राजधानीचे शहर होते. नंतरच्या काळात आंध्र, चालुक्य ,राष्ट्रकूट यांची सत्ता पुण्यावर होती. मध्ययुगात यादव बहामनी, निजामशाही, आदिलशाहीची सत्ता पुण्यावर होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच पुण्याजवळील ( जुन्नर ) शिवनेरी येथे झाला.
पुढे पेशव्यांच्या काळात पुणे हे मराठीशाहीचे राजधानीच बनले. इंग्रजा विरुद्ध लढलेले आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची पुणे ही कर्मभूमी होती. आद्य समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या सामाजिक कार्यास पुण्यातून सुरुवात केली. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्यासह 1848 मध्ये बुधवार पेठेतील भिडे वाडा येथे मुलींसाठी ची पहिली शाळा सुरू केली. राष्ट्रीय काँग्रेसची पहिली नियोजित सभा पुण्यातच होणार होती. परंतु प्लेगच्या साथीमुळे हा मान मुंबईला मिळाला. पुण्यामध्ये महात्मा गांधींचे प्रदीर्घ वास्तव्य होते. कस्तुरबा गांधी यांनी आगाखान पॅलेस येथे आपले शेवटचे श्वास घेतले. भारताचे स्वतंत्र 1947 मध्ये पुण्याने जल्लोषात साजरे करत शनिवार वाड्यावर तिरंगा स्थापित केला.
पुणे जिल्ह्यातील तालुके :-
पुणे जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत.
पुणे, हवेली, खेड,पुरंदर, आंबेगाव,शिरूर, जुन्नर, इंदापूर,बारामती, वेल्ही, भोर ,मावळ,मुळशी, दौंड इ.
पुणे जिल्हा महसूल उपविभाग –
पुणे जिल्ह्यामध्ये एकूण सहा महसूल उपविभाग आहेत.
पुणे, भोर, मावळ,हवेली, खेड, बारामती.
पुणे जिल्हा पंचायत समिती –
पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 13 पंचायत समिती आहेत .
हवेली, खेड ,आंबेगाव, जुन्नर ,पुरंदर ,मुळशी, मावळ ,शिरूर, इंदापूर ,बारामती, भोर, दौंड, वेल्हे इ.
पुणे छावणी मंडळ –
पुणे जिल्ह्यात एकूण तीन छावणी मंडळे आहेत.
पुणे, खडकी, देहू रोड इ.
पुणे जिल्हा भौगोलिक माहिती :-
पुणे जिल्हा महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला स्थित आहे. 15,367 चौ. कि.मी. क्षेत्रफळासह हा महाराष्ट्रातील अहमदनगर नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा जिल्हा आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुके आहेत.
पुणे या प्रशासकीय विभागात एकूण 6 जिल्हे आहेत.
पुणे जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर हरिश्चंद्र डोंगर रांगा, पश्चिमेला सह्याद्री पर्वताचा प्रदेश आहे.
पूर्वेला कुकडी, घोड व भीमा नद्यांनी सीमा आखली आहे, तर दक्षिणेला नीरा नदीची सीमा आहे.
पुणे जिल्हा नैसर्गिक सीमा :-
पुणे जिल्ह्याच्या पूर्वेस अहमदनगर जिल्हा आहे.
तसेच पश्चिमेस रायगड जिल्हा आहे.
पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेस सातारा जिल्हा आहे.
तर वायव्येस ठाणे जिल्हा आहे.
पुणे जिल्ह्याच्या आग्नेयस सोलापूर जिल्हा आहे.
पुणे जिल्ह्यातील प्रमुख घाट :-
१.कात्रज घाट- पुणे -सातारा मार्ग
2. खंबाटकी घाट- पुणे -सातारा
3. तामिनी घाट – पुणे- माणगाव
4. वरंदा घाट -भोर – महाड
5. दिवे घाट – पुणे बारामती
6. बोरघाट – पुणे – मुंबई
7. माळशेज घाट- आळेफाटा – कल्याण
8. नाणेघाट- जुन्नर – कल्याण.
पुणे जिल्हा प्राकृतिक :-
पुणे जिल्ह्याची विभागणी अभ्यासाच्या दृष्टीने तीन विभागात केली जाते.
1. पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश – पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात सह्याद्रीच्या रांगा आहेत.या विभागास ‘ घाटमाथा ‘असेही म्हणतात. कोकण प्रदेश व देश या दरम्यानचा हा प्रदेश सुमारे 5 ते 10 कि.मी. रुंदीचा आहे. या भागात जुन्नर, आंबेगाव, खेड ,मुळशी, भोर तालुक्यांचा भाग येतो.
2. सह्याद्रीच्या पूर्वेकडील मावळ प्रदेश –
घाटमाथ्याच्या पूर्वेस 30 ते 40 कि.मी. रुंदीच्या प्रदेशास ‘ मावळ ‘असे म्हणतात. हा डोंगराळ भाग आहे. यामध्ये शिरूर,हवेली व पुरंदर तालुक्याचा भाग येतो.
3. जिल्ह्याचा मध्य व पूर्व भाग सपाट पठारी आहे – पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागास ‘ देश ‘असेही म्हणतात. या भागात भीमा व तिच्या उपनद्यांची खोरी आहेत. यामध्ये दौंड, बारामती, इंदापूर तालुक्यांचा भाग येतो.
🟢 पोलीस भरती 2024 सराव प्रश्नसंच 🟢
Police Bharti 2023 Questions 01
Police Bharti 2023 Questions 02
Police Bharti 2023 Questions 03
हवामान :-
पुणे जिल्ह्याचे सरासरी तापमान 6° ते 41° सेल्सिअस पर्यंत असते.
हवामान बहुतांश कोरडे व सौम्य असते. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर दरम्यान नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो.
पावसाचे वितरण घाटमाथा 300 ते 400 मि.मी. तर पूर्व भागात ७० ते १२० मि.मी. असे आहे.
जिल्ह्याचा पूर्व भाग आवर्षणप्रवण क्षेत्रात मोडतो. जुन्नर आंबेगाव खेड शिरूर दौंड बारामती इंदापूर पुरंदर व हवेली तालुक्याचा आवर्षणप्रवण क्षेत्रात समावेश होतो.
मृदा :-
पश्चिमेकडील डोंगराळ भागात तांबडी मृदा आढळते. ( जुन्नर,आंबेगाव, पुरंदर, खेड)
पूर्वेकडील पठारी प्रदेशात तपकिरी मृदा आढळते ( दौंड ,हवेली, खेड ,शिरूर)
इंदापूर व बारामती तालुक्यात काळी कसदार मृदा आढळते .यामुळे येथील शेतीचा विकास अधिक झाल्याचे दिसते .
नद्या :-
नदी हा पावसाच्या पाण्याच्या वितरणाचा एक समृद्ध स्रोत आहे. अनेक शहर संस्कृती या केवळ नदीच्या अस्तित्वावरच निर्माण झालेल्या आहेत. पुणे जिल्ह्याला नदी जलस्रोतांचे मोठे योगदान लाभले आहे . नद्यांनी आर्थिक सामाजिक व आध्यात्मिक बळ पुण्याला दिल्याचे दिसते . या नद्यांचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत.
1. भीमा नदी – भीमा नदीचे खोरे हे प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातच पसरलेले आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाची लांब नदी म्हणून भीमा नदीचा उल्लेख होतो.
भीमा नदीचा उगम भीमाशंकर येथे पुण्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये होतो.
बालाघाट डोंगराच्या दक्षिणेस भीमा वाहते तर उत्तरेस गोदावरी ही नदी वाहते.
भीमा नदी कृष्णेची उपनदी आहे. कृष्णा -भीमा संगम कर्नाटक रायचूर जवळ कुरगुड्डी येथे होतो.
भीमेच्या उपनद्या – भामा, इंद्रायणी, मुळा -मुठा , नीरा , माण,वेळ, घोड, सीना इत्यादी
2. नीरा नदी – नीरा नदीचा उगम भोर तालुक्यामध्ये होतो.निरा नदी जिल्ह्याच्या दक्षिण सीमेलगत पश्चिम- पूर्व दिशेला वाहते.
कऱ्हा ही नीरा नदीची प्रमुख उपनदी आहे. नीरा नदी शेवटी भीमा नदीस मिळते.
3. वेळ नदी – आंबेगाव तालूक्यातील सातगाव पठारावर वेळेश्वर या ठीकानी उगम पावते . पेठ गावातून ही नदी पुणे-नाशिक रस्त्यावर येते. तेथून पाबळ धामारी शिक्रापूर येथे वाहत येउन तळेगाव ढमढेरे येथे भीमा नदीस मिळते वेळ नदीची लांबी 68 किलोमीटर आहे या नदीवर पाबळ जवळ थिटेवाडी पाझर तलाव नावाचे लघू धरण आहे.
4. घोड नदी – पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातून वाहणारी भीमेची आग्नेयवाहिनी उपनदी. आंबेगाव तालुक्यातील आहुपे गावाजवळ हिचा उगम असून दौंडच्या वायव्येस पाच किमी. सांगवीनजिक ती भीमेस मिळते. या नदीची एकूण लांबी अंदाजे १४५ किमी. असून मीना आणि कुकडी या तिच्या प्रमुख उपनद्या आहेत. आंबेगाव, घोडेगाव, वडगाव आणि शिरूर ही तिच्या काठांवरील मुख्य गावे. घोडखोऱ्याचा मध्य व पूर्व भाग कमी पावसाच्या दुष्काळी भागात मोडतो त्यामुळे शिरूर तालुक्यात या नदीवर मातीचे धरण बांधून शेतीस पाणी नुकतेच उपलब्ध करून दिलेले आहे.
पुणे सांस्कृतिक :-
उत्सव – पुणे येथे अनेक उत्सव मोठ्या व सांस्कृतिक स्वरूपात साजरे केले जातात जसे की – गणेश उत्सव लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक केलेला गणेश उत्सव पुण्यात आजही मोठ्या जल्लोषात सांस्कृतिक पद्धतीने साजरा केला जातो.
वसंत व्याख्यानमाला , सवाई गंधर्व संगीत महोत्सव, शनिवार वाडा, महोत्सव दहीहंडी उत्सव, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, आषाढी – कार्तिक वारी , शिवजयंती उत्सव, पुलोत्सव, पुरुषोत्तम व फिरोदिया करंडक स्पर्धा.
पुण्यातील प्रमुख नाट्यगृहे :-
बालगंधर्व रंगमंदिर, आचार्य अत्रे रंगमंदिर, टिळक स्मारक मंदिर, मराठा मंदिर, भरत नाट्य मंदिर ,सुदर्शन रंगमंच, गणेश कला क्रीडा मंच ,सवाई गंधर्व स्मारक, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, अंकुशराव लांडगे नाट्यगृह, रामकृष्ण मोरे नाट्यगृह इ
पुण्यातील महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था :-
अ. विद्यापीठे
1. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – 1949
2. भारती विद्यापीठ – 1964
3. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ -१९८५
ब. संरक्षण शिक्षण संस्था
1. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ( एन. डी. ए.)-खडकवासला
2. आय. एन. एस. शिवाजी – लोणावळा
3. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजीनियरिंग -दापोडी
4. कॉलेज ऑफ नर्सिंग पुणे – पुणे.
5. बॉम्बे इंजीनियरिंग ग्रुप अँड सेंटर- खडकी
6. आर्मी स्कूल ऑफ फिजिकल ट्रेनिंग- पुणे
7. इंटेलिजन्स कोअर ट्रेनिंग- पुणे
8. सशस्त्र सेना चिकित्सा महाविद्यालय- पुणे
9. आर्मी फोर्स मेडिकल कॉलेज – रेस कोर्स.
क . वैज्ञानिक व संशोधन संस्था
1. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी – पुणे ,भोसरी.
2. नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट – भोसरी.
3. सेंटर फॉर डेव्हलपमेंट स्टडीज अँड ऍक्टिव्हिटी पुणे – बावधन, पुणे.
4. भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट – पुणे .
5. नॅशनल नॅचरोपॅथी- पुणे
6. सेंट्रल वॉटर अँड पावर रिसर्च स्टेशन – पुणे
7. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी – पुणे
8. इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेट टेक्नॉलॉजी – पुणे.
9. इंडियन ड्रग लॅबोरेटरी – पुणे
10. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटरॉलॉजी – पुणे.
11. एक्सप्लोजीव रिसर्च अँड डेव्हलपमेंट – पुणे
ड. पुणे जिल्ह्यातील इतर महत्त्वाच्या संस्था –
1.नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट
2. इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन
3. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया
4. नॅशनल फिल्म आरकाईव्ह
5. नॅशनल इन्शुरन्स अकॅडमी
6. आदिवासी संशोधन संस्था
7. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट
8. वैदिक संशोधन केंद्र
9. ज्ञान प्रबोधनी संस्था
10. फर्ग्युसन महाविद्यालय
11. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन संस्था
12. प्रादेशिक फळ संशोधन केंद्र
13. भारतीय इतिहास संशोधन केंद्र
14. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ
15. कृत्रिम अवयव केंद्र (वानवडी)
पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध स्थळे :-
1. शिवनेरी किल्ला – पुण्यापासून 93 किलोमीटर अंतरावर जुन्नर जवळ शिवनेरी किल्ला आहे. याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता. शिवनेरी किल्ला गड परिसरात सातवाहन काळातील 50 बौद्ध लेण्या आहेत. शिवनेरी किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून 1100 मीटर इतकी आहे .किल्ल्यावर शिवाई देवी मंदिर, गंगा- जमुना पाण्याच्या टाक्या, शिवाजी पुतळा इत्यादी बाबी आहेत.
2. सिंहगड किल्ला – पुण्यापासून 25 किलोमीटर अंतरावर किल्ले सिंहगड आहे .हा किल्ला सह्याद्रीच्या भुलेश्वर डोंगररांगेत आहे.
किल्ल्याची उंची 1310 मीटर आहे. सिंहगड किल्ल्याची पूर्वीचे नाव कोंढाणा होते. गड आला पण सिंह गेला या उद्गारातील सिंह म्हणजेच नरवीर तानाजी मालुसरे गड जिंकताना धारातीर्थी पडले . यावरून शिवरायांनी गडाचे नाव सिंहगड ठेवले (1670) सिंहगड किल्ल्यावर तानाजी स्मारक, कोंढाणेश्वर मंदिर, दूरदर्शन रिले सेंटर, टिळक बंगला ,उदयभानाचे थडगे, कल्याण दरवाजा, द्रोणागिरीचा कडा, दुसरे राजाराम महाराजांची समाधी,देवटाके ,गणेशटाके, घोड्यांची पागा इत्यादी बाबी आहेत.
3. राजगड – पुण्याजवळील वेल्हे येथे राजगड किल्ला आहे. येथे शिवरायांची दुसरी राजधानी होती. राजगडावरती सईबाईंची समाधी आहे.
गडाची उंची 1395 मीटर इतकी आहे. राजगडावर पद्मावती माची , सुवेळा माची, संजीवनी माची, पद्मावती तलाव, शिव मंदिर चिलखती बुरुज प्रेक्षणीय आहे.
4. पुरंदर किल्ला – पुण्यापासून 45 किलोमीटर अंतरावर प्राचीन इंद्रनील पर्वत म्हणजेच पुरंदर किल्ला होय. पुरंदर जवळच वज्रगड आहे. पुरंदर हे सवाई माधवरावांचे जन्मस्थळ आहे. मुरारबाजी व दिलेरखानाची लढाई पुरंदर किल्ल्यावर झाली होती.
5. तोरणा किल्ला – हा किल्ला पुण्यापासून 64 किलोमीटर अंतरावर आहे. प्रचंड गडाचे बदललेले नाव म्हणजे तोरणा होय. छत्रपती शिवाजींनी तोरणा गड जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले असे म्हणतात. किल्ल्याच्या बांधकामात सोन्याची हांडे सापडले होते हा शुभशकुन मानला गेला.
6. इतर किल्ले – लोहगड,पुरंदर, जीवधन, श्रीवर्धन, रोहिडेश्वर , तोरणा ( प्रचंड गड ), तुंग गड, मल्हारगड, राजमाची, विसापूर,वज्रगड, श्रीवर्धन इत्यादी.
पुण्यातील धार्मिक स्थळे :-
1. अष्टविनायक गणपती – एकूण आठ अष्टविनायक गणपती पैकी पाच गणपती हे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत .
मोरेश्वर, चिंतामणी, महागणपती ,विघ्नहर, गिरिजात्मक हे पाच गणपती पुणे जिल्ह्यात आहेत.
2. आळंदी – देवाची आळंदी म्हणून पावन असलेले संत ज्ञानेश्वर महाराज समाधी स्थळ पुण्यापासून 25 किलोमीटर अंतरावर खेड तालुक्यात आहे. आळंदी इंद्रायणी नदीच्या किनारी वसलेले आहे. आळंदी येथे 1296 मध्ये संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या 21व्या वर्षी समाधी घेतली होती. आषाढी कार्तिकीच्या निमित्ताने येथे राज्यभरातून भाविकांची गर्दी जमते. वारकरी सांप्रदायातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून आळंदीचा लौकिक आहे. येथे अज्ञान वृक्ष ,पुंडलिक मंदिर, गोपाळपुरा इत्यादी पवित्र स्थान आहेत. आळंदी जवळच मरकळ येथे विपश्यना ध्यान केंद्र आहे.
3. देहू – संत तुकाराम महाराज यांची समाधी देहू येथे आहे. पुण्यापासून 35 किलोमीटर अंतरावर इंद्रायणी काठी वसलेले देहू हे गाव आहे. संत तुकोबांनी येथील ‘भंडारा डोंगरावर ‘ अजरामर अशा अभंग रचना लिहिल्या आहेत.
तुकाराम बीजेला येथे उत्सव साजरा होतो.
देहू येथे चोखामेळाचे मंदिर आहे
4. जेजुरी – जेजुरी पुण्यापासून पन्नास किलोमीटर अंतरावर पुरंदर तालुक्यात आहे. जेजुरीचा खंडोबा हे महाराष्ट्राचे दैवत मानले जाते. मनीमल्लासुराचा वध करण्यासाठी महादेवाने मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला होता. मल्हार, खंडोबा, मार्तंड -भैरव, महाळसापती अशी खंडोबाची नावे आहेत. खंडोबाची 11 प्रमुख पवित्र स्थानांपैकी सहा महाराष्ट्रात व पाच कर्नाटकात आहेत.
5. श्री. भीमाशंकर ज्योतिर्लिंग – भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असे हे सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर तालुका खेड येथे आहे.
येथील अभयारण्यात शेकरू ही महाकाय खार आढळते (शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे). पुण्यापासून शंभर किलोमीटर अंतरावर सुमारे 3454 फूट उंचीवर भीमाशंकराचे मंदिर आहे. येथे भीमा नदीचे उगमस्थान आहे. भीमाशंकर थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.
6. नारायणपूर – एक मुखीदत्ताचे जागृत देवस्थान म्हणून नारायणपूर प्रसिद्ध आहे. नारायणपूर पुण्यापासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर सासवडच्या जवळ आहे.
पुणे जिल्ह्यातील इतर प्रमुख स्थळे :-
लोणावळा, खंडाळा, सासवड, उरळी कांचन, बारामती, राजगुरुनगर, नाणेघाट, तुळापूर इ.
पुणे जिल्हा औद्योगिक :-
महाराष्ट्रातील औद्योगिक दृष्ट्या प्रगत जिल्ह्यामध्ये पुण्याचा वरचा क्रमांक आहे. पुण्यामध्ये उपलब्ध पायाभूत सोयी सुविधा, कुशल मनुष्यबळ मुंबईपासून ची जवळीकता यामुळे येथे उद्योगांचा चांगला विकास झालेला दिसतो. जिल्ह्यात दूध उत्पादने, वीडी उद्योग, प्लास्टिक उद्योग असे अनेक लहान उद्योग चालतात. आंबेगाव, जुन्नर ,खेड येथे तेल गिरण्या , सारोळे येथे कागद निर्मिती, भोरचे रंग उद्योग इत्यादी. पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिसरात अनेक नावाजलेले मोठे उद्योग आहेत. पुणे- मुंबई राष्ट्रीय महामार्गाचा औद्योगिक पट्टा म्हणून विकास झालेला दिसतो. पुण्यामध्ये अवजड साहित्य निर्मिती याचबरोबर सेवा क्षेत्र सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
पुणे जिल्ह्यातून तीन राष्ट्रीय महामार्ग व एक द्रुतगती मार्ग जातो . पुणे जिल्ह्यातून 314 किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग जातो. तसेच जिल्ह्यातून 318 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग जातो.
पुणे जिल्ह्यातील साखर कारखाने :-
पुणे जिल्ह्यात एकूण 11 सहकारी साखर कारखाने आहेत. तसेच पुणे जिल्ह्यात 6 सहकारी दूध संघ आहे.
पुणे जिल्ह्यातील समस्या :-
पुणे जिल्ह्यात प्रत्येक प्रभागात कचऱ्याच्या प्रक्रिया करण्याच्या कचरा नष्ट करण्याची मोठी समस्या आहे. लवासा प्रकल्पास स्थानिक आदिवासींचा विरोध आहे. झोपडपट्टी पुनर्वसन व अतिक्रमणाच्या समस्या रखडलेल्या आहेत. चाकण येथील विमानतळ स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधामुळे पुरंदर भागात स्थलांतराच्या दिशेत आहे. पुणे शहरात अंतर्गत वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झालेली आहे. शहराला पाणी कपातीच्या प्रश्नावर प्रत्येक वर्षी अतिरिक्त नियोजनाची आवश्यकता असते.
पुणे जिल्ह्यावर आतापर्यंत विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्नोत्तरे :
01: महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?
1) कोल्हापूर
2) मुंबई
3) पुणे
4) नागपूर
उत्तर : 3) पुणे
02: महाराष्ट्रात ‘आगाखान पॅलेस’ हा कोणत्या जिल्ह्यात आहे ?
1) मुंबई
2) पुणे
3) नागपूर
4) कोल्हापूर
उत्तर : 2) पुणे
03: पुणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे ?
1) जुन्नर
2) कोरेगाव
3) वढू
4) पुरंदर
उत्तर : 3) वढू
04: शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे ?
1) जुन्नर
2) पुरंदर
3) मावळ
4) शिरूर
उत्तर : 1) जुन्नर
05: राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे ?
1) छ.संभाजीनगर
2) मुंबई
3) नागपूर
4) पुणे
उत्तर : 4) पुणे